गडचिरोली हादरले : गिझरच्या करंटने तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू

673

गडचिरोली हादरले : गिझरच्या करंटने तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, घरातील गिझरच्या करंटचा जबरदस्त झटका बसून एका तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कारगील चौक परिसरात घडली आहे. जयंत मनोहर भांडेकर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भांडेकर हे ‘जयंत आटा चक्की’चे संचालक म्हणून शहरात परिचित होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून ते मंगळवारी रात्री घरी परतले. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता गिझरमधून विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले.

बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिले असता जयंत हे निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

जयंत भांडेकर हे कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने मिरची गल्ली व कारगील चौक परिसरात शोककळा पसरली असून, भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे.

आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.