खुल्या पटांगणात आढळला युवकाचा मृतदेह; गडचिरोली हादरले, हत्येचा संशय

1973

खुल्या पटांगणात आढळला युवकाचा मृतदेह; गडचिरोली हादरले, हत्येचा संशय

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३ : शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाशेजारील खुल्या पटांगणात रविवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहर हादरले. सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा धक्कादायक प्रकार दिसून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत युवकाचे नाव हरबचन खन्ना पटवा (वय २४), रा. गोकुळनगर, गडचिरोली असे असून, त्याच्या मृत्यूमागे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. युवकाची अन्य ठिकाणी हत्या करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक हा दारू विक्री करून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ही घटना शनिवारी उशिरा रात्री घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह हलविण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली असून, त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

#gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #CrimeNews #MurderSuspect #DeadBodyFound #BreakingNews #MaharashtraNews #Policelnvestigation #GadchiroliCity #LatestNews #Youth Death #ForensicInvestigation #IndiaNews #ShockingIncident #OpenGroundCase #CrimeAlert #lokvruttnews @Lokvrutt News