नियम न पाळणाऱ्या आस्थापनांना समजपत्र वाटप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील दुकान, हॉटेल, कार्यालये तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक प्राधान्याने लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात शहरातील अनेक आस्थापनांना समजपत्र देऊन मराठी पाट्या तातडीने लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनविसेने दिलेल्या समजपत्रात महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून शासन निर्णय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक दुकान, हॉटेल, कार्यालय आणि सर्व प्रकारच्या आस्थापनांच्या पाट्यांवर मराठी भाषा मोठ्या व ठळक अक्षरांत असणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काही आस्थापनांच्या पाट्यांवर मराठी भाषा नसल्याचे किंवा इतर भाषांच्या तुलनेत मराठी अक्षरे लहान असल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार नियमभंग असून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असल्याचा आरोप मनविसेने केला आहे.
तसेच संबंधित आस्थापनांनी आपल्या दुकानांचा फलक देवनागरी लिपीत आणि इतर भाषेपेक्षा मोठ्या अक्षरांत तातडीने लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समजपत्र मिळाल्यानंतरही योग्य बदल न केल्यास संबंधित आस्थापनांसमोर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा अंतिम इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषेचा आदर करणे हे प्रत्येक व्यावसायिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत, प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.











