शेतात मोहफुले वेचताना वाघाचा हल्ला ; इसमाचा दुर्दैवी अंत
लोकवृत्त न्यूज
नागभीड : तालुक्यातील मींथुर येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हरिदास महादेव कुबडे (वय ५८) असे मृत इसमाचे नाव असून, शनिवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी ते शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते.
संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. सुमारे सहा वाजताच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय कुबडे शेताकडे गेला असता त्याला वाघांची जोडी व तीन बछडे दिसून आले. या भीतीदायक दृश्यामुळे तो तातडीने गावात परतला व घटनेची माहिती ग्रामस्थ, वनविभाग व पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक व नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र हरिदास कुबडे यांचा काहीही मागमूस लागला नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता शेतात कुबडे यांचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. परिसरात चार ते पाच वाघांचा वावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष तातडीने ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, पुढील तपास वनविभाग व नागभीड पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.














