Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा ‘ॲक्शन मोड’; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर नगरपंचायतीला फटकारले

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा ‘ॲक्शन मोड’; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर नगरपंचायतीला फटकारले

354

धानोरा येथील अभ्यासिकेला दिली सदिच्छा भेट; आता अभ्यासिकेत गररणार एसी!

लोकवृत्त न्यूज
​धानोरा :- कधी प्रत्यक्ष मैदानात उतरून तर कधी प्रशासकीय बैठकांतून जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे आमदार डॉ. मिलिंद नरोटे आज पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत पाहायला मिळाले. धानोरा येथील सार्वजनिक अभ्यासिकेला त्यांनी अचानक सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी अभ्यासिकेतील दुरवस्था आणि सोयी-सुविधांचा अभाव पाहून त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले.
​विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या
​अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींशी संवाद साधताना अनेक गंभीर बाबी समोर आल्या. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अभ्यासिकेतील वातावरण अत्यंत उष्ण आणि दमट झाले आहे. अशा परिस्थितीत तासनतास बसून अभ्यास करणे विद्यार्थ्यांना अशक्य होत असल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी आमदारांकडे मांडली. तसेच पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी सोय नसल्याचे निदर्शनास आले.
​आता अभ्यासिकेत लागणार एसी (AC)
​विद्यार्थ्यांचे हाल पाहून डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने दखल घेतली. अभ्यासिकेतील उष्णता कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी संपूर्ण अभ्यासिका वातानुकूलित (AC) करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच शुद्ध आणि मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्या.
​नगरपंचायत प्रशासनाला कडक सूचना
​”विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना सोयी-सुविधा पुरवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. उन्हाळ्याच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होता कामा नये. अभ्यासिकेत एसी आणि पाण्याची सोय तातडीने पूर्ण करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे,” अशा शब्दांत डॉ. नरोटे यांनी प्रशासनाला ताकीद दिली.
​आमदारांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे धानोरा येथील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता नगरपंचायत प्रशासन या कामाला किती वेगाने पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!