Home Breaking News गडचिरोलीत पेट्रोल पंपावर कृत्रिम तुटवडा?; पेट्रोल उपलब्ध असूनही ग्राहकांना देण्यास नकार

गडचिरोलीत पेट्रोल पंपावर कृत्रिम तुटवडा?; पेट्रोल उपलब्ध असूनही ग्राहकांना देण्यास नकार

92

गडचिरोलीत पेट्रोल पंपावर कृत्रिम तुटवडा?; पेट्रोल उपलब्ध असूनही ग्राहकांना देण्यास नकार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २२ : जिल्हाभरात पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर “पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही” असे फलक झळकत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी पेट्रोल मिळते तर कधी मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
दरम्यान, गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील शिवानी पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असूनही ग्राहकांना विविध कारणे सांगून पेट्रोल देण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधित पेट्रोल पंपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असतानाही काही कर्मचाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. काही ग्राहकांना पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे कॅनधारकांना अतिरिक्त रक्कम घेऊन पेट्रोल दिले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. कॅनमध्ये पेट्रोल भरण्यासाठी तब्बल २०० रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याची चर्चा वाहनधारकांमध्ये रंगली आहे.
यामुळे संबंधित पेट्रोल पंपावर मनमानी कारभार सुरू असल्याचे बोलले जात असून कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, याच पेट्रोल पंपावर यापूर्वीही निष्काळजीपणाचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. डिझेल वाहनात चुकीने पेट्रोल भरण्यात आल्याची घटना घडल्याने संबंधित पेट्रोल पंपाच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले होते.
जर पेट्रोल उपलब्ध असूनही कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांना नाहक त्रास दिला जात असेल, तर संबंधित यंत्रणांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.

Don`t copy text!