५० हजारांची लाच घेताना शबरी महामंडळाचा लेखापाल रंगेहात गजाआड

550

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १७ :- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., गडचिरोली (विधाते भवन) येथील कार्यकारी लेखापाल रूपेश वसंत बारापात्रे (वय ४० वर्षे, कंत्राटी कर्मचारी, वर्ग-३) यांना ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
तक्रारदार हे आदिवासी समाजातील बेरोजगार युवक असून, त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे मालवाहू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरीचा अर्ज केला होता. या संदर्भात तय झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली असता, आरोपी रूपेश बारापात्रे यांनी शाखा व्यवस्थापकाच्या नावाने ५०,०००/- रुपयांची स्पष्ट लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संतोष पाटील, पो. नि. शिवाजी राठोड आणि त्यांच्या पथकाने गोपनीयरीत्या तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., गडचिरोली (विधाते भवन, चामोर्शी रोड) येथे ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये कलम ७, ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान (अँटी करप्शन ब्युरो, नागपूर), अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम (ला. प्र. वि., नागपूर), अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे (ला. प्र. वि., नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांच्या देखरेखीखाली पार पडली.
यामध्ये पो.नि. संतोष पाटील, पो.नि. शिवाजी राठोड, सफौ. सुनिल पेद्दिद्वार, पो.ह.वा. स्वप्नील बांबोळ, पो.ह.वा. राजेश पद्मनीरीवार, पो.ह.वा. किशोर जोजांरकर, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे, हितेश जेट्टीवार, मयोशी विढ्या म्हशालेत्री, मपोशि ज्योत्सना वसाके, चा. पो. ह. वा. राजेश्वर कुमरे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी व्यक्तीने (एजंट) शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीशी संपर्क साधावा.
– पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews  #crime #ACB @acb  )