लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 23:- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने ‘संविधान सन्मान महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत 25 व 26 मार्च रोजी दोन दिवसीय संविधान परिषद आयोजित करण्यात आली असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान जागर घडविण्यात येणार आहे.
परिषदेचे उद्घाटन 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ संविधान तज्ज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे अध्यक्षस्थानी असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्चला सकाळी 9 वाजता संविधान दिंडी काढण्यात येणार असून, विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालय असा तिचा मार्ग असेल. सकाळी 10.30 वाजता संविधानावर आधारित ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता “भारतीय संविधानाला अपेक्षित लोकशाहीचे स्वरूप” या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 3 वाजता “संविधान मूल्यांच्या प्रचार आणि प्रसारात माध्यमांची भूमिका” या विषयावर पॅनेल चर्चा होईल. संध्याकाळी 6 वाजता नागपूर येथील बोधी फाउंडेशन प्रस्तुत “आम्ही भारताचे लोक” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
26 मार्चला सकाळी 10 वाजता “भारतीय संविधान आणि युवकांची जबाबदारी” या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 2 वाजता “भारतीय संविधान आणि महिला” या विषयावर परिसंवाद होईल. संध्याकाळी 4 वाजता समारोप कार्यक्रम होणार असून, यामध्ये संविधान जागर अभियानाचे समन्वयक स्वप्नील फुसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठातील संविधान सन्मान महोत्सव समितीने परिषदेचे संपूर्ण नियोजन केले असून, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे यांनी केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Ad.Dr. Suresh Mane)

