सुरजागड इस्पात प्रकल्पाला हिरवा कंदील! गडचिरोलीत उद्योगविकासाला गती

158

गडचिरोलीत उद्योगविकासाला गती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगविकासाचा नवा अध्याय सुरू होत असून, सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला स्थानिक जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पर्यावरणविषयक जनसुनावणी शांततामय पार पडली. झालेल्या या सुनावणीत नागरिकांनी प्रकल्पाच्या उभारणीस पाठिंबा दर्शवला. यावेळी सुनावणीत आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, दीपक आत्राम, तसेच राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोजगार आणि विकासाची नवी संधी

या प्रकल्पांतर्गत बेनिफिशिएशन प्लांट, पॅलेट प्लांट, स्पंज आयर्न प्लांट, इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल आणि १५० मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

पर्यावरणपूरक विकासाचे आश्वासन

पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत ९०० झाडांच्या बदल्यात १ लाख झाडे लावण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासह स्थानिकांना सोयी-सुविधा व रोजगाराच्या संधी देण्याची हमी देण्यात आली आहे.

नक्षलवादाला आळा आणि विकासाची नवी दिशा

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रकल्पासाठी स्वतःची जमीन दिली असून, यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होईल आणि नक्षलवाद्यांच्या प्रभावाला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि उद्योगविहीन जिल्ह्यात हा प्रकल्प विकासदूत ठरेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व नेतृत्वाने व्यक्त केली आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnew #lokvruttnews

#gadchirolinews # #LLOYDS METALS #Lloyds Metals and Energy Limited)