गडचिरोली : वैद्यकीय अधिकाऱ्याने मागितली लाच, पोलिसांनी केली अटक

574

आरोग्य विभागात खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २६ : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे (वय ३६, वर्ग-१) यांना १.३० लाख रुपयांची लाच रकमेची मागणी केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई २६ मार्च रोजी करण्यात आली. सदर कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या बिलावर सही करण्यासाठी डॉ. भोकरे यांनी १.५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १.३० लाख रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय तपास करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, आरोपीने लाचेची मागणी केल्यावर तात्काळ कारवाई करत त्याला अटक करण्यात आली.
हा परिसर नक्षल चळवळीने प्रभावित असूनही, पोलिसांनी धाडसी कारवाई केली. या घटनेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडा मिळणार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #aarogya vibhag #health department
#ACB @acb #ACB GADCHIROLI)