– गडचिरोलीसह अनेक भागांत बनावट टोळ्या सक्रिय; प्रशासनाला तत्काळ कारवाईची गरज
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- केंद्र शासनाने असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांचा समावेश असलेला व्यापक डाटाबेस तयार करण्यासाठी ‘ई-श्रम पोर्टल’ सुरु केले आहे. गिग वर्कर, प्रवासी कामगार, प्लॅटफॉर्म वर्कर, बांधकाम मजूर, घरेलू कामगार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गिग कामगार (जसेकी ओला, उबर, ॲमेजेंन, फ्लिपकार्ट, झोमाटो, स्विगी इत्यादी)आदींनी स्वतः https://eshram.gov.in/indexmain या अधिकृत संकेतस्थळावर तसेच कामगारानां स्वतः नोंदणी करणे शक्य नसल्यास नजिकच्या सेतू केंद्र किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गडचिरोली जिल्हाधिकारी संकुल, बॅरेक क्र. २, कॉम्पलेक्स येथे स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करू शकता येणार आहे.
तर नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तालुका कामगार कार्यालयातील अधिकृत कर्मचारी हा डाटाबेस तयार करण्यासाठी फील्ड वर्क करत असल्याचे समजत असून ते ठरावीक परिसरात, गावांमध्ये जाऊन ई-श्रम नोंदणीचे काम करत आहेत. मात्र, या अधिकृत मोहिमेच्या आडून खोटे शासकीय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या बनावट एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.
गावोगावी फिरून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची गोपनीय माहिती उघडपणे मागणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, “आम्ही अमुक शासकीय कार्यालयातून आलो आहोत” असे सांगत ही टोळी नागरिकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र, नियुक्ती आदेश अथवा खात्याची पुष्टी करणारा कागद नसल्यामुळे त्यांचे बनावट असणे ठळकपणे समोर येत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खासगी माहिती चोरी होण्याची गंभीर शक्यता वर्तवली जात आहे. शासनाच्या लोकाभिमुख योजनेचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या “कोण खरे अधिकारी आणि कोण बनावट एजंट?” हे ओळखणे सामान्य नागरिकांसाठी खूपच कठीण झाले आहे. कारण बनावट एजंट सुद्धा शासकीय भाषेत बोलतात, कागदपत्रांसारखे भासणारे कागद दाखवतात, आणि विश्वास बसावा अशा पद्धतीने संवाद साधतात.
ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनते जेव्हा खरे कर्मचारीही घरोघरी जाऊन फील्ड वर्क करत असतात — त्यामुळेच नागरिक गोंधळून जातात.
या गोंधळात नागरिक काय करू शकतात?
शासकीय ओळखपत्राची मागणी करा – खरे अधिकारी हे नेहमीच आपले अधिकृत ओळखपत्र दाखवू शकतात.
त्यांचा विभाग आणि संपर्क तपासा – त्यांनी कोणत्या कार्यालयातून नियुक्ती मिळाली आहे, त्याचा अधिकृत क्रमांक घ्या आणि खात्री करून घ्या.
नोंदणी साठी मोबाईलवरून स्वतः प्रयत्न करा – https://eshram.gov.in/indexmain या संकेतस्थळावरून थेट नोंदणी करणे हे सुरक्षित आणि मोफत आहे.
तपासणीशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका.
स्थानिक पोलीस किंवा प्रशासनास माहिती द्या – संशयास्पद व्यक्तींविषयी त्वरित कळवा.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
ई-श्रम नोंदणी पूर्णपणे मोफत आहे; कोणतीही फी देऊ नका.
फक्त https://eshram.gov.in/indexmain संकेतस्थळ किंवा अधिकृत केंद्रांवरच नोंदणी करा.
शासकीय अधिकारी म्हणून आलेल्या व्यक्तीकडे ओळखपत्र आहे का, हे तपासा.
आधार, पॅन, बँक खाते यांसारखी माहिती अधिकृत नसलेल्या व्यक्तींना देऊ नका.
संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
शासनाच्या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य कामगारांपर्यंत पोहचवताना त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर गंभीर दखल घेऊन बनावट एजंटांवर तत्काळ कारवाई करणे ही काळाची गरज बनली आहे.












