देऊळगाव धान अपहार प्रकरण : ३.९६ कोटींचा गैरव्यवहार उघड, दोन अधिकारी अटकेत

371

देऊळगाव धान अपहार प्रकरण : ३.९६ कोटींचा गैरव्यवहार उघड, दोन अधिकारी अटकेत

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा (गडचिरोली), १९ एप्रिल :- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात तब्बल ३ कोटी ९६ लाख ६५ हजार ९६५ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, अन्य संबंधितांची चौकशी सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर (३९), प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. देऊळगाव (रा. लहान गोधनी, यवतमाळ) आणि हितेश व्ही. पेंदाम (३५), विपणन निरीक्षक तथा ग्रेडर (रा. आरमोरी, गडचिरोली) यांचा समावेश आहे.

शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान प्रक्रियेत हे अपहार प्रकरण घडले. वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये १९,८६०.४० क्विंटल धान खरेदी दाखवण्यात आला होता. परंतु चौकशीत प्रत्यक्षात फक्त १५,९१६.३२ क्विंटल धान भरडईस गेले असल्याचे समोर आले. उर्वरित ३,९४४.०८ क्विंटल धानाचा कोणताही ठावठिकाणा न सापडल्याने १ कोटी ५३ लाख ९३ हजार ९८० रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

तसेच, २०२४-२५ मध्ये १७,२६२.४० क्विंटल धान खरेदी दाखवण्यात आले होते, मात्र केवळ ११,१२२.४० क्विंटलच प्रत्यक्षात आढळले. उर्वरित ६,१४० क्विंटल धान व वापरलेल्या बारदानातील तफावत लक्षात घेता २ कोटी ४२ लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी उप-प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा. सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., आरमोरी येथील हिंमतराव सुभाष सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९/२०२५ अन्वये कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) भान्यासं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शेतकरी संघटनांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व शेतकरी व्यक्त करत आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #crime)