जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

184

– युवक-युवतींसाठी उत्साहवर्धक बक्षिसांची घोषणा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात उत्साहाचे आणि आरोग्यदायी वातावरण पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने शनिवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमुळे युवकांमध्ये नवी ऊर्जा संचारणार आहे.
इंदिरा गांधी चौक येथून सुरू होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुलांसाठी पाच किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले असून ते इंदिरा गांधी चौक ते जिल्हा न्यायालयापर्यंत असणार आहे. तर मुलींसाठी इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौक या तीन किलोमीटर अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात होणार असून शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक आणि भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. मुलांसाठी प्रथम पारितोषिक ₹७,०००, द्वितीय ₹६,०००, तृतीय ₹५,०००, चतुर्थ ₹४,०००, पाचवे ₹३,००० आणि सहावे पारितोषिक ₹२,००० असे ठेवण्यात आले आहे. तर मुलींसाठी प्रथम पारितोषिक ₹५,०००, द्वितीय ₹४,०००, तृतीय ₹३,०००, चतुर्थ ₹२,००० आणि पाचवे पारितोषिक ₹१,००० इतके असणार आहे. याशिवाय सहभागी मुला-मुलींसाठी प्रत्येकी पाच प्रोत्साहनपर बक्षिसे ₹५०० रुपये देण्यात येणार आहेत.
या मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे. ही स्पर्धा केवळ धावण्याची नाही, तर आरोग्य, ऊर्जा, आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे.