गडचिरोलीत भीषण अपघात : पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक गंभीर

1002

– नागपूरला हेलिकॉप्टरने हलवले; वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळपणावर संतापाची लाट

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ता. 29 एप्रिल :– शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता घडलेल्या भीषण अपघातात पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) हे गंभीर जखमी झाले. MH-34 M-8970 क्रमांकाच्या भरधाव हायवा ट्रकखाली त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला आणि त्यांच्या डाव्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर वासनिक यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हेलिकॉप्टरमार्फत हलवण्यात आले. या वेळी प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची धुरा स्वतः सांभाळली. त्यांनी दाखवलेली माणुसकी आणि संवेदनशीलता पोलीस दलासह नागरिकांमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरली आहे.
दरम्यान, ज्या चौकात हा अपघात झाला तो चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या चौकात ना सिग्नल व्यवस्था आहे, ना गतिरोधक, ना वाहतूक पोलीस. परिणामी अपघातांचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणाच्या असुरक्षिततेबाबत नागरिक अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही परिस्थितीत बदल झालेला नाही.


ही दुर्घटना घडल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, “अपघातानंतर सगळे जागे होतात, पण वेळेपूर्वी कोणीच उपाय करत नाही,” असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. “या चौकात सतत धोकादायक स्थिती असते, तरीही वाहतूक नियंत्रणासाठी स्थायी व्यवस्था का केली जात नाही?” असा थेट सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त हायवा ट्रक चालकाविरोधात पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अनास्थेचा चेहरा उघड केला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #accident)