वनपाल संजय रामगुंडेवार यांचा ‘मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन’ क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव

540

वनपाल संजय रामगुंडेवार यांचा ‘मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन’ क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- वनविभाग गडचिरोली अंतर्गत कार्यरत वनपाल संजय ऋषीजी रामगुंडेवार यांना २०२४-२५ या वनसेवेतील कार्यकाळात मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर धानोरा रांगी उपक्षेत्र परिक्षेत्रात त्यांचे कार्य क्षेत्र असून, स्थानिक नागरिक आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करून सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची वनविभागाने अधिकृतपणे दखल घेतली आहे.
मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली व उपवनसंरक्षक यांच्या उपस्थितीत रामगुंडेवार यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानपत्रात त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करताना म्हटले आहे की, ” संजय रामगुंडेवार यांनी मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनाच्या कामात अत्युत्कृष्ट कामगिरी बजावली असून, त्यांच्या कार्याने वनसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.”
गडचिरोली सारख्या जैवविविधतेने समृद्ध पण वन्यजीव संघर्षाच्या घटनांनी त्रस्त असलेल्या भागात, स्थानिक समाजात जागरूकता निर्माण करणे, वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास जपणे आणि त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून धोरणात्मक पावले उचलणे ही जबाबदारी अत्यंत जिकिरीची असते. अशा कठीण परिस्थितीत रामगुंडेवार यांनी शांतता आणि समजुतीच्या मार्गाने काम करत, ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आणि वन्यजीव संरक्षणात समाजाचा सहभाग वाढवला.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी वनविभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा सन्मान केवळ एका कर्मचाऱ्याचा गौरव नसून, गडचिरोली वनपरिक्षेत्रातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #forestdepartment @वन विभाग #Sanjay Ramgundewar)