सुपिक शेतजमिनी वाचवा : मुरखळा शेतकरी उठाव जनआंदोलनाच्या उंबरठ्यावर

404

– कुसुमताई आलाम यांचा शासनाला इशारा – ‘जमीन घेतली तर शेतकरी जगणार कसे?’

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (प्रतिनिधी) : – गडचिरोली जिल्ह्यातील मुरखळा, पुलखल, कनेरी, नवेगाव व मुडझा या पाच गावांतील सुपिक शेतजमिनी प्रस्तावित विमानतळ प्रकल्पात जाणार असल्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून 28 एप्रिलपासून साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनात शरद पाटील (ब्राम्हणवाडे) व तुकाराम भिकाजी रेचनकर (पुलखल) आमरण उपोषण करत आहेत. प्रकल्पामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याच्या टोकावर असून त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. शासनाने याआधी झुडपी जंगल असलेल्या परिसरातच विमानतळासाठी जागा सुचवली होती, तीच जागा वापरावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या गावांपैकी तीन गावे पेसा कायद्यांतर्गत असून ग्रामसभांनी ठराव करून प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. मात्र, शासनाने अजूनही शेतकऱ्यांच्या आक्षेपपत्राला उत्तर दिलेले नाही. शेतजमिनी अधिग्रहित करताना कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या लढ्याला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, 2 मे रोजी “द हितवाद”चे ज्येष्ठ पत्रकार रोहिदासजी राऊत, हंसराज उंदिरवाडे, विलास निंबोरकर, हरिदास कोटरंगे (अंनिस) यांच्यासह अनेक मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन एकजुटीचा संदेश दिला. माजी खासदार मारोतराव कोवासे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
विशेष म्हणजे, मनरेगाच्या कामांनाही थांबवून अनेक महिला आंदोलनात सक्रीय सहभागी होत आहेत.
माजी जि.प. सदस्य व आदिवासी सेविका कुसुमताई आलाम यांनी आंदोलनस्थळी सांगितले, “गडचिरोलीसारख्या जंगलप्रधान जिल्ह्यात शेतीयोग्य जमीन अत्यल्प आहे. जर हीच जमीन प्रकल्पासाठी गेली, तर शेतकरी कसे जगतील? हा संघर्ष आता जनआंदोलनाचे रूप घेणार आहे.”
शेवटी, हे आंदोलन केवळ जमिनीचे नव्हे, तर अस्तित्वासाठीचे आहे – अशी प्रखर भावना आंदोलनात उमटते आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra )