वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ :- पाणीपुरवठा योजनेचे काम गूणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश देतानाच पाइपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरित पूर्वस्थितीत करण्याचे व त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते, कृष्णाजी गजबे, महेंद्र ब्राम्हणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध नळपाणी पोहोचविण्यात येणार आहे. आरमोरी शहरातील प्रत्येक कुटुंबाला याचा थेट लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल, तर सर्व जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे, असे मत ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडले.
धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे पाणी थांबवायला आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका, असा पाणी वाचविण्याचा संदेश त्यांनी दिला.
खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, अशोक नेते, कृष्णाजी गजबे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाला नगरपरिषद, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #पाणीपुरवठा योजना )

