गडचिरोली : रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या तेंडुपत्ता कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडला

1020

– पोलिस तपास सुरू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १६ मे :- भामरागड तालुक्यातील दलशु पुशु वडे (वय ५५) या तेंडुपत्ता कामगाराचा मृत्यू रहस्यमय अवस्थेत झाला आहे. १० मे रोजी बैलबंडीवरून पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांना भामरागड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अहेरी आणि पुढे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते.
रविवार, ११ मे रोजी त्यांना गडचिरोली रुग्णालयात भरती करण्यात आले. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, मंगळवारी रात्री जेवणानंतर ते रुग्णालयातून अचानक गायब झाले. त्याबाबत नातेवाईकांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केला होता.
दरम्यान, १६ मे रोजी सकाळी ११ वाजता कोटगल बॅरेगजवळच्या नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दलशु पुशु वडे यांचाच असल्याचे ओळख पटवण्यात आले असून, सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणात मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #gadchirolipolice )