विनापरवानगी ड्रोन उडविल्यास होणार कारवाई

28

विनापरवानगी ड्रोन उडविल्यास होणार कारवाई

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २१ मे:-भारत – पाकिस्तान युद्धजन्य परिस्थतीमध्ये दहशतवादी-राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एयरक्राफ्ट, पॅराग्लायर व इतर मानवरहित हवाई यंत्र चा वापर करुन त्यांच्या हल्यांमध्ये आणि त्याद्वारे अतिमहत्वाच्या व जिल्ह्यातील मर्मस्थळांना लक्ष्य करु शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. या कारणास्तव ड्रोन रिमोट कंट्रोल्ड मायक्रा-लाईट एयरक्राफ्ट, पॅराग्लायडर व इतर मानवरहित हवाई यंत्राद्वारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी यावर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्रात पुढील 15 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्रात प्रतिबंधात्मक आणि सक्रीय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक, गडचिरोली तथा कार्यकारी दंडाधिकारी नीलोत्पल यांच्याद्वारे सदर आदेश निर्गमित करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 नुसार हा आदेश जिल्ह्रातील कार्यक्षेत्रात 20 मे 2025 ते 03 जून 2025 या काळासाठी प्रतिबंध करण्याचे आदेश गडचिरोली पोलीसांकडून देण्यात आलेला आहे. मात्र यास हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या विशिष्ट लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, याद्वारे एकतर्फी आदेश पारित करण्यात आले असून सदरचा आदेश लोकांच्या माहितीसाठी प्रसार माध्यमांद्वारे आणि सर्व पोलीस स्टेशन येथे नोटीस बोर्डवर प्रती चिटकवून प्रकाशित केला जाणार आहे.

कोणत्याही व्यक्तीने सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास तिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी नमूद आदेशाचे उल्लंघन करु नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून करण्यात आले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal #drone #ड्रोन )