राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
लोकवृत्त न्यूज
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर भा.पो.से. (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना आदेश जाहीर केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 अंतर्गत गृह विभागाने हे आदेश २२ मे २०२५ रोजी जारी केले असून, यामध्ये एकूण २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील अभियान विभागाचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांची बदली करून त्यांना पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील वाढती कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या यादीत अनेक महत्त्वाच्या बदल्यांचा समावेश आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली पोलीस उप आयुक्त, बृहनमुंबई पदावर करण्यात आली आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे, तर समादेशक, रा.रा.पोलीस बल गट क्र. १, पुणे आंचल दलाल यांची बदली पोलीस अधीक्षक रायगड येथे झाली आहे.
त्याचप्रमाणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, अकोला, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, बुलढाणा, नाशिक, लातूर,पुणे, सातारा, सांगली अशा राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, संजय वाय. जाधव यांची देखील या आदेशानुसार बदली केली जाणार असून, त्यांच्या नवीन पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश लवकरच निर्गमित केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेत नवचैतन्य निर्माण होईल, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत अधिक परिणामकारकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal #drone #ड्रोन #IPS )

