गडचिरोलीत मोठी चकमक: चार जहाल माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

788

गडचिरोलीत मोठी चकमक: चार जहाल माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२३ :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती जंगलात गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान मोठे यश मिळवत चार जहाल माओवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई अतिरीक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या १२ पथकांद्वारे (सुमारे ३०० कमांडो) आणि सीआरपीएफच्या सहकार्याने पार पडली.

विश्वासार्ह माहितीवरून नुकत्याच स्थापन झालेल्या कवंडे पोस्ट परिसरात माओवादी दबा धरून असल्याचे समजल्यावर, काल दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावर शोधमोहीम राबवण्यात आली. मुसळधार पावसात ही मोहीम सुरू असतानाच, आज सकाळी माओवाद्यांनी अचानक सी-६० कमांडोंवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देत दोन तास चाललेल्या भीषण चकमकीत चार माओवादी ठार केले.

चकमकीनंतरच्या झाडाझडतीत पोलिसांनी एक स्वयंचलित SLR रायफल, दोन .३०३ रायफल, एक भरमार, तसेच वॉकी टॉकी, छावणी व नक्षल साहित्य जप्त केले आहे.

सध्या उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात जोरदार शोधमोहीम सुरू आहे. पोलीस विभागाकडून या कारवाईबाबत लवकरच सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

ही कारवाई गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी संघर्षातली आणखी एक ठळक आणि निर्णायक कामगिरी ठरली आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal )