भेंडाळा गावात माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा संदेश

85

भेंडाळा गावात माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा संदेश

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी (ता.प्र.) :– तालुक्यातील भेंडाळा गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देणारे सखोल प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमात शेतजमिनीची उत्पादकता वाढवण्यास मदत होणाऱ्या विविध माती परीक्षण तंत्रांचा प्रत्यक्ष परिचय देण्यात आला.
माती परीक्षण म्हणजे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यासारखी दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नघटकांचे विश्लेषण. यामधून जमिनीची पोत, विद्युत वाहकता व इतर रासायनिक गुणधर्म समजून घेतले जातात. हे परीक्षण कसे करावे, मातीचा नमुना योग्य पद्धतीने कसा घ्यावा आणि नमुना प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर मिळालेल्या अहवालाच्या आधारे शेतीतील उत्पादन कसे वाढवावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी दिले.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना माती परीक्षणामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली – जसे की योग्य पीक निवड, खतांचा काटेकोर वापर, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम तसेच प्रलय झाडे, छबील दुधबळे, पवन बुधबावरे, उषा गजभिये, मृदशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक महेंद्र लिल्हारे आणि भाग्यश्री संग्रामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वेदांत कडसकर, जयेश लेनगुरे, युसुफ लोणारे, जय मोहुर्ले आणि कृष्णमूर्ती मुंडे यांनी विशेष सहभाग नोंदवला.
भेंडाळा गावात झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबतची जागरूकता वाढली असून भविष्यातील शाश्वत शेतीसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.