गडचिरोली शहरात उड्डाण पुलाची तातडीने गरज : एमआयएम पक्षाची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २१ जून : गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतूक समस्येला उपाय म्हणून कठानी नदी ते बी.एस.सी. कॉलेज आणि नवेगाव ते माडेतुकुम या मार्गांवर तात्काळ उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सुरजागड येथील लोहखनिज उत्खननामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, जड वाहनांची शहरातून होणारी नियमित वाहतूक आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत, असे एमआयएम पक्षाचे पदाधिकारी म्हणाले. शासनाला लोहखनिज प्रकल्पातून हजारो कोटींचा महसूल मिळत असतानाही गडचिरोली शहरात आवश्यक मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, ही बाब नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
गडचिरोली शहरातील प्रमुख मार्गांवर उड्डाण पूल उभारण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदन प्रसंगी एमआयएम जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद, किरण सहारे, महासचिव मुकेश डोंगरे, शहर युवा अध्यक्ष मुन्ना रामटेके, तसेच राकेश वेसकडे, महबुब मलिक, शहेबाज शेख, सलाम शेख, रेहान शेख, जिशान शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #aimim @ )










