पायाभूत सुविधांअभावी संतप्त नागरिकांचा एमआयएम नेतृत्त्वात प्रशासनाला जाब
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २७ जून :- आरमोरी रोडवरील सुमानंद लॉनच्या मागे वसलेली लक्ष्मीनगर वस्ती आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असून, या परिस्थितीला कंटाळून महिलांनी अखेर थेट मुख्याधिकारी सुर्यकांत पिद्दूरकर यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत प्रशासनाला झणझणीत जाब विचारला.
तोडेवार ते मंडल यांच्या घरापर्यंतचा रस्ता आजही कच्चा असून, अपूर्ण व अरुंद नाल्यांमुळे पावसात पाणी साचून रस्त्याचा तलाव बनतो. परिसरात अनेक घरे असूनही येथे अद्याप सीसी रस्त्याचे काम न झाल्याबद्दल रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे, “जिथं फक्त एकच घर आहे, तिथं सीसी रस्ता बनतो आणि आमच्या वस्तीला वाऱ्यावर सोडलं जातं”, अशी संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या निवेदनप्रसंगी एमआयएम जिल्हाध्यक्ष बाशिद शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले. “जर समस्या तत्काळ सोडवल्या नाहीत, तर लक्ष्मीनगरमध्ये तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या वेळी एमआयएमचे सोशल मिडिया प्रमुख जावेद शेख, युवा नेते शहबाज शेख तसेच लक्ष्मीनगरमधील अनेक महिला उपस्थित होत्या.
वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या वस्तीच्या पायाभूत सुविधा मिळवण्यासाठीचा लढा आता निर्णायक वळणावर असून, प्रशासनाच्या पुढील कृतीकडे संपूर्ण लक्ष्मीनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #नगरपरिषद गडचिरोली #लक्ष्मीनगर )

