गडचिरोलीत एमआयएमचे भव्य शक्तिप्रदर्शन

105

– समीर साजिद बिल्डर यांचे संघटना बळकटीकरणाचे आवाहन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १८ जुलै (प्रतिनिधी) :- गडचिरोली शहरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ढोल-ताशांच्या गजरात भव्य शक्तिप्रदर्शन झाले. महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर, विदर्भ नेते शाहिद भाई रंगूनवाला, कृष्णा भाऊ जाधव व निसार अहमद यांचे इंदिरा गांधी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर निघालेल्या भव्य रॅलीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

रॅली संस्कृती लॉन येथे पोहोचल्यानंतर मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले की, “एमआयएम ही सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा पक्ष असून, प्रत्येक समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी ही चळवळ झपाट्याने उभी राहात आहे.” येणाऱ्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या वेळी बिल्डर यांनी गडचिरोलीत लवकरच प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची सभा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांना गडचिरोलीत बोलावण्याचे आश्वासनही दिले.

शाहिद भाई रंगूनवाला आणि कृष्णा भाऊ जाधव यांनी जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमची घडी गडचिरोलीत प्रभावीपणे बसली असून, विविध समाजघटकांचे कार्यकर्ते पक्षात सहभागी होत असल्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात तौसिफ शेख, मुजाहिद शेख, किरण सहारे, अयान कुरेशी, सलमान शाह, भैसारे, निजाम शेख, मारोती भोयर यांचा पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा आयशा अली सय्यद, शगुफ्ता शेख, जया कोंडे, सरीता बावणे, शमीना शेख, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, तसेच शाहरुख शेख, सिद्दीक मन्सूरी, साजिद शेख, रमजान शेख, जुबेर खान, अनिल संतोषवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीत एमआयएम पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.