सावंगीच्या शेतात आधुनिकतेची पाऊलवाट : ‘ओळीतील पूर्ण लागवड’ पद्धतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार
लोकवृत्त न्यूज
वडसा, २७ जुलै – तालुक्यातील सावंगी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान २०२५-२६ अंतर्गत धान पिकावर आधारित ‘ओळीतील पूर्ण लागवड’ पद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. आधुनिक शेतीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या या उपक्रमात शेतकऱ्यांना PKV तिलक या उन्नत वाणाचे बीज वितरित करण्यात आले. सूक्ष्म जीवाणू संवर्धनाने बीज प्रक्रिया करून, बेड पद्धतीने पेरणी करण्यात आली.
उत्पादन वाढीच्या दृष्टीने आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या विविध लागवड पद्धती – जसे की दोरीच्या साहाय्याने २०x२० सें.मी. अंतरावर पेरणी, ओळीत पूर्ण लागवड आणि दर १२ ओळींनंतर एक फूट अंतर राखणे – याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक कृषी अधिकारी तुषार टिचकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शेतशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या पद्धतींचा अनुभव मिळवून देण्यात आला.
प्रगत शेती तंत्रज्ञानाचे फायदे उलगडताना उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत बोधे (वडसा-२) यांनी ‘पट्टा पेरणी’ पद्धतीचे विविध लाभ सविस्तर समजावून सांगितले. यामध्ये कीड-रोग नियंत्रण, चांगली वातानुकूलन व्यवस्था, मशागतीस सोयीस्कर अंतर आणि पिक उत्पादनात लक्षणीय वाढ या गोष्टींचा समावेश होता.
या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीत आधुनिकतेची जोड देत सावंगीतील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता आला असून, ही शेतशाळा ग्रामीण शेती विकासासाठी दिशादर्शक ठरल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.










