गडचिरोली: कोंबड्यांच्या झुंजीवर लावला जुगार, सहा आरोपी ताब्यात

685

– २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ जुलै :- जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अवैधरित्या कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजींवर पैंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा जुगारांवर बंदी घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व स्थानिक पोलीस ठाणी, उपपोलीस ठाणी आणि मदत केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले होते. त्यानुसार २७ जुलै रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा पोतेपल्ली रै येथील जंगल परिसरात अवैधरित्या कोंबड्यांच्या झुंजींवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून कारवाई केली.
कारवाईदरम्यान काही जणांनी पोलीसांची चाहूल लागताच जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सहा आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पांडुरंग तिम्मा, ऋषी तिम्मा, महेंद्र कुलेटी, विजय कुलेटी (सर्व रा. पोतेपल्ली रै, ता. चामोर्शी), करण बिश्वास (रा. शिमुलतला, चामोर्शी) आणि शामल अहीरवार (रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून हिरो होंडा स्प्लेंडर, स्प्लेंडर प्रो, स्प्लेंडर प्लस, सीडी १०० मोटारसायकल, अ‍ॅक्टीवा स्कुटी, रोख रक्कम ११,७७० रुपये, तीन झुंजीचे कोंबडे, तीन लोखंडी काती असा एकूण २,२४,१०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रेगडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार मधुकर सुर्यवंशी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान रेगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मालु पंुगाटी, सचिन निमगळे, शिवा आडे, जितेंद्र बोलीवार, गुलशन आत्राम, संदीप खेडकर, सुनील गेडाम, आशिष सोनमनवार, सुनील मडावी, विवेक घोडीचोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गडचिरोली पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध जुगारांवर कठोर कारवाई करून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #gadchirolipolic #CockfightRaid #IllegalGambling
#Gadchiroli Police #CockfightCrackdown #GamblingBust #MaharashtraNews #Crime NewsIndia #PoliceAction #GadchiroliUpdates #AntiGamblingDrive #कोंबडा_बाजार #अवैधजुगार #गडचिरोलीपोलिस #झुंजविरोधीकारवाई #पोतेपल्ली #नीलोत्पल #गडचिरोलीबातमी #जुगारकारवाई #गुन्हेवार्ता
#Maharashtra Police )