– चाळीस दिवसांपासून ठिय्या देणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा संतप्त इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ जुलै :- वडसा वन विभागातील भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि कंपन्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गेल्या चाळीस दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आज अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले. मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी आज ढोल वाजवत ‘ढोल बजाओ आंदोलन’ छेडले आणि झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा इशारा दिला.
आरमोरी व पोर्ला वनपरिक्षेत्रांत रात्रीच्या वेळी अवैधरित्या मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा दाखल करून त्यांच्या वाहनांची तात्काळ जप्ती करावी, तसेच या प्रकरणी आर्थिक हितसंबंध जपत चुकीचे अहवाल देणाऱ्या आरमोरीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर, क्षेत्र सहाय्यक अरुण गेडाम यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तथापि, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनकर्त्यांचा संयम सुटत चालला आहे.
या संदर्भात वारंवार पुरावे देऊनही वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक बी. वरूण यांनी सदर गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष केले असून, उलटपक्षी कंपनीच्या बाजूने अहवाल सादर करून तक्रारकर्त्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून झालेल्या विचारणीकडेही त्यांनी दुर्लक्ष केले असून, त्यांच्या या वर्तणुकीमुळे परिसरात नाराजीचा सूर वाढत आहे.
श्रीकृष्ण वाघाडे, शंकर ढोलगे, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर, प्रवीण ठाकरे या आंदोलनकर्त्यांनी मागील चाळीस दिवसांपासून शांततेत ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, आजच्या ढोल बजाओ आंदोलनाद्वारे त्यांनी वन विभागाच्या झोपेला झणझणीत जागा दिली आहे. या आंदोलनानंतर तरी प्रशासन योग्य ती कारवाई करते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #forest department )













