तीन महिला नक्षलीचा समावेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली पोलीस व सिआरपीएफच्या संयुक्त माओवादीविरोधी अभियानात गडचिरोली–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत चार जहाल माओवादी ठार झाले आहेत. यात एका पीपीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह तिघा सदस्य माओवादींचा समावेश असून शासनाने त्यांच्यावर एकूण १४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सी-६० चे २० पथक आणि सीआरपीएफच्या दोन क्यु.ए.टी. तुकड्या २५ ऑगस्ट रोजी कोपर्शी परिसरात दाखल झाल्या होत्या. अवघड जंगल परिसर आणि सततचा पाऊस यांचा सामना करत जवानांनी सलग दोन दिवस शोधमोहिम राबवली. काल सकाळी जवानांवर दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी माओवादींना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र माओवादींनी गोळीबार सुरूच ठेवल्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. जवळपास आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर घटनास्थळी एक पुरुष व तीन महिला माओवादी मृतावस्थेत आढळले. त्यांची ओळख मालु पदा (४१, पीपीसीएम, बक्षीस ६ लाख), क्रांती ऊर्फ जमुना हलामी (३२, कंपनी क्र. १० सदस्य, बक्षीस ४ लाख), ज्योती कुंजाम (२७, अहेरी दलम सदस्य, बक्षीस २ लाख) व मंगी मडकाम (२२, गट्टा दलम सदस्य, बक्षीस २ लाख) अशी झाली असून त्यांच्या नावावर चकमक, खून व जाळपोळ यांसह तब्बल ४६ गंभीर गुन्हे दाखल होते. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एसएलआर, दोन इन्सास, एक .३०३ रायफल, ९२ जिवंत काडतुसे, तीन वॉकीटॉकी आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त केले आहे.
या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे कौतुक करताना गडचिरोलीत माओवादीविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. सन २०२१ पासून गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत ९१ माओवादी ठार, १२८ अटक आणि ७५ आत्मसमर्पण घडवून आणले असून हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माओवादींनी शस्त्र खाली ठेवून समाजमुखी प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
#LOKVRUTTNEWS #lokvruttnews #LOKVRUTT.COM #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Maoist Encounter #C60Commandos #CRPF #PoliceOperation #Naxalism #Maharashtra Police #GadchiroliNews #Security Forces #Maoist Women.

