माओवाद्यांचा थरकाप : सी-६० पार्टी कमांडर वासुदेव मडावींचा पराक्रम गाजला

492

माओवाद्यांचा थरकाप : सी-६० पार्टी कमांडर वासुदेव मडावींचा पराक्रम गाजला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढाईत आपल्या शौर्यपूर्ण आणि निर्भय नेतृत्वामुळे माओवाद्यांचा थरकाप उडवणारे सी-६० पथकाचे पार्टी कमांडर व पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि.) वासुदेव राजम मडावी यांचा आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
सन १९९८ मध्ये पोलीस शिपाई पदावर रुजू झालेले मडावी यांनी गेल्या २६ वर्षांच्या अखंड सेवेत सातत्याने शौर्य दाखवत तीन वेगवर्धित पदोन्नती मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. नक्षलविरोधी विशेष मोहिमांमध्ये त्यांनी थेट सहभाग घेऊन ५८ चकमकींमध्ये तब्बल १०१ माओवादींना कंठस्नान घालण्याचा पराक्रम केला असून ५ जहाल माओवादींना जिवंत अटक करण्यातही यश मिळवले आहे.
त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, “असाधारण आसूचना कुशलता पदक” तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले असून आणखी दोन शौर्यपदकांसाठी त्यांची नावे विचाराधीन आहेत.
मडावी यांनी गाजवलेल्या ऐतिहासिक चकमकींमध्ये बोरीया-कसनासूर येथील ४०, मर्दिनटोला येथील २७, गोविंदगाव येथील ६, कोपर्शी-कोढूर येथील ५, कतरंगट्टा येथील ३ तर नुकत्याच झालेल्या कोपर्शी येथील चकमकीत ४ माओवादींना कंठस्नान घालण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली आहे.
आज गडचिरोली येथे झालेल्या समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोउपनि. वासुदेव मडावी यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या शौर्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षेला महत्त्वपूर्ण बळकटी मिळाली असून ते संपूर्ण पोलीस दल आणि तरुण जवानांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

#LOKVRUTTNEWS #lokvruttnews #LOKVRUTT.COM #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Maoist Encounter #C60Commandos #CRPF #PoliceOperation #Naxalism #Maharashtra Police #GadchiroliNews #Security Forces #Maoist Women.#पोउपनि. वासुदेव_मडावी #Vasudev_Madavi