गट्टा–सुरजागड रस्ता प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’; बसचे चाक रुतले, मोठा अपघात टळला

229

गट्टा–सुरजागड रस्ता प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’; बसचे चाक रुतले, मोठा अपघात टळला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ४ :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा–सुरजागड मार्गावर बुधवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस अडेंर–नेडर गावाजवळ रस्त्याच्या दलदलीत अडकून थांबली. बसचे चाक रस्त्यात खोलवर रुतल्याने प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
वांगतुरी येथून सुटलेली ही बस अहेरीकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला अचानक चाक फसले. प्रवासी घाबरून गेले. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. या मार्गावर सतत खड्डे, चिखल व अडथळ्यांमुळे बससेवा धोकादायक ठरत असून, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज उपसण्यासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ आहे; पण जनतेच्या रोजच्या जीवघेण्या प्रवासाकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही असा रोष नागरिक व्यक्त करीत आहे.
गट्टा–सुरजागड रस्ता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

#गडचिरोली #एटापल्ली #गट्टासुरजागडरस्ता #एसटीबस #अपघातटळला #रस्त्यांचीदुर्वस्था #ग्रामीणप्रवासी #लालपरी #मृत्यूचासापळा #लोकवृत्त