मनविसेच्या मागणीला यश : गडचिरोली नगरपरिषदेकडून मराठी नामफलक सक्तीचा आदेश

279

गडचिरोली नगरपरिषदेकडून मराठी नामफलक सक्तीचा आदेश

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २६ : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) सातत्यपूर्ण मागणीनंतर गडचिरोली नगरपरिषदेकडून कार्यक्षेत्रातील सर्व आस्थापने, हॉटेल्स, दुकाने व विविध संस्था यांनी आपल्या दर्शनीय पाट्या मराठी भाषेत, देवनागरी लिपीत व मोठ्या ठळक अक्षरांत लावणे अनिवार्य असल्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून कळविण्यात आले आहे की, १ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पाट्या मराठी भाषेत न केल्यास संबंधित आस्थापनांवर थेट २,००० दंड आकारण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनविसे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष इंजि. अंकुश संतोषवार, शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगरपरिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. व्यवसायिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेऊन मराठीत नामफलक लावून महाराष्ट्राच्या अस्मितेला न्याय द्यावा.”या आदेशामुळे शहरातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व संस्थांनी तातडीने नामफलक मराठीत बसविण्यास सुरुवात केली आहे.