उसनवारीतून वाद, सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची निर्घृण हत्या; प्रेत नाल्यात फेकले

574

उसनवारीतून वाद, सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची निर्घृण हत्या; प्रेत नाल्यात फेकले

लोकवृत्त न्यूज
मूल, ता. २८ :- उसनवार घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या व्यवहारातून काटा काढण्यासाठी एका युवकाने सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सुनिल कालीदास गेडाम (वय ६०, रा. टेकाडी) असे खून झालेल्या केंद्रप्रमुखाचे नाव आहे. तर किस्मत मोहम्मद अली सय्यद (वय २४, रा. टेकाडी) हा आरोपी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी गेडाम व किस्मत सय्यद यांनी रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर आरोपीने “महत्वाचे काम आहे” असे सांगून गेडाम यांना टेकाडी परिसरात नेले. रात्री ८.३० च्या सुमारास एमआयडीसी मार्गावर आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने गेडाम यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह मरेगाव–टेकाडी मार्गावरील नाल्यात फेकून दिला.
गेडाम उशिरा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा मोबाईल, पल्सर दुचाकी, चष्मा व चप्पल आकापूरजवळ रस्त्याच्या कडेला आढळून आले. संशयाच्या आधारावर मुलगा पंकज गेडाम यांनी मूल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीत पोलिसांनी आरोपी किस्मत सय्यद याला ताब्यात घेऊन खडाजंगी चौकशी केली असता त्याने उसनवार रकमेच्या वादातून खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दाखविलेल्या ठिकाणी मृतदेह मिळून आला. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे पाठविण्यात आला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले व पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.