अल्पवयीन चालकाकडून दुचाकीने अपघात : वयोवृद्धाचा मृत्यू

837

– वाहनमालकावरही गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 14 :- नवेगाव कॉम्प्लेक्स येथील भारत पेट्रोलपंपजवळ आज सकाळी घडलेल्या अपघातात एका वयोवृद्ध नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन चालकासह वाहनमालकावरही गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप रमेश चलाख (वय 41, रा. नवेगाव कॉम्प्लेक्स, गडचिरोली) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे वडील रमेश आडकू चलाख (वय 67) हे आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 ते 12.00 वाजताच्या सुमारास नवेगाव भारत पेट्रोलपंपजवळ रस्त्याने जात असताना मोपेड (क्र. MH-34-CS-2142) ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात चलाख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर मोपेड ही राणी आहुजा (वय 35, रा. किसाननगर, ता. सावली, जि. चंद्रपूर) यांच्या मालकीची असून, त्यांनी ही गाडी अल्पवयीन मुलास चालविण्यास दिली होती. अल्पवयीन मुलगा हा अपघाताच्या वेळी अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
वाहन अल्पवयीनाकडे देऊन निष्काळजीपणाने वर्तन केल्याबद्दल वाहनमालक राणी आहुजा यांच्यावर व अल्पवयीन मुलावर गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 105 तसेच मोटार वाहन कायदा कलम 180(3), 181, 199(अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पो.उ.नि. दिपक चव्हाण हे करीत असून, पुढील तपास सुरू आहे.