– एमव्हीजी कंपनीच्या नियमबाह्य कारभारावर संताप, अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
लोकवृत्त न्यूज
अहेरी (जि. गडचिरोली) दि. १२ नोव्हेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नव्याने उभारलेल्या महिला व बाल रुग्णालयात बाह्यस्त्रोत पुरवठा करणाऱ्या एमव्हीजी कंपनीकडून विनापरवानगी आणि नियमबाह्य पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविल्याचा गंभीर आरोप होत आहे. रुग्णालयात शासकीय मंजुरीशिवाय मुलाखती घेण्यात येत असून, रुग्णसेवेच्या वेळात उमेदवारांच्या गर्दीमुळे उपचारसेवेत अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे.
एमव्हीजी ही केवळ मनुष्यबळ पुरवठा करणारी संस्था असतानाही, तिने थेट रुग्णालय परिसरात पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेस उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी थेट सहकार्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.
भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीत पदांची संख्या, पगार, आवश्यक शिक्षण व अनुभवाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केवळ “मनुष्यबळाची आवश्यकता” एवढेच नमूद असल्याने ही प्रक्रिया पूर्णतः अस्पष्ट आणि अपारदर्शक असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले होते. उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच ही बिननियम पदभरती प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली असून, या अराजक प्रक्रियेमुळे उमेदवारांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया गेल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि युवकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.













