शेती, ट्रॅक्टर गेलं… अखेर किडनीही गेली ; सावकारीने मोडला शेतकरी
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर :- सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या बळीराजाचे जीवन किती अमानुषपणे उद्ध्वस्त होते, याचे काळीज पिळवटून टाकणारे वास्तव चंद्रपूर जिल्ह्यात समोर आले आहे. कर्जफेडीसाठी स्वतःची किडनी विकण्याइतका टोकाचा निर्णय घ्यावा लागलेल्या शेतकऱ्याची ही घटना केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नसून, संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रोशन सदाशिव कुडे या अल्पभूधारक शेतकऱ्याची ही हृदयद्रावक कहाणी आहे. केवळ चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रोशन कुडे यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. कुटुंबाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले.
मात्र दुर्दैवाने खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेतीही सलग पिकली नाही. यानंतर सावकारी कर्जाचा फास आवळत गेला. अवाजवी व्याजामुळे कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढत गेली. सावकारांकडून सततचा मानसिक छळ, घरात येऊन अपमानास्पद वागणूक आणि धमक्यांचा सामना करावा लागला.
कर्जातून सुटका मिळवण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर शेती विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील संसारोपयोगी साहित्य विकले; तरीही कर्ज संपले नाही. धक्कादायक बाब म्हणजे केवळ एक लाख रुपयांच्या कर्जावर अवाजवी व्याज लावून ही रक्कम तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका लाखावर दररोज दहा हजार रुपये व्याज आकारले जात असल्याचेही समोर आले आहे.
या अमानुष वसुलीला कंटाळून आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी अखेर या बळीराजाने अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला. कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी स्वतःची किडनी विकली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, माणूसकी कुठे हरवली आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुळे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष घाटबांदे आणि सत्यवान राम रतन बोरकर या सहा जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित शेतकऱ्याला तातडीने न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून जोर धरत आहे.
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर जात असताना, ही घटना प्रशासन, सावकारीविरोधी कायदे आणि शासनाच्या योजनांची परिणामकारकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरली आहे. बळीराजाला शेतीत जगता येत नाही, हेच या घटनेचे सर्वात भयावह वास्तव आहे.













