विसापूर–सोनापूरला विकासाची लॉटरी ; ३१ एकर शासकीय जमीन मंजूर, जमिनीचे दर गगनाला
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरालगतच्या विसापूर–सोनापूर परिसरातील जमिनीला येत्या काळात ‘सोन्याचे’ भाव मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राज्य शासनाने या भागातील ३१ एकर शासकीय जमीन विविध विकासकामांसाठी गडचिरोली जिल्हा परिषदेला मंजूर केल्याने परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून, त्याचा थेट परिणाम जमिनीच्या दरवाढीवर होणार आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय व सार्वजनिक प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विसापूर व सोनापूर येथील एकूण १२.७५ हेक्टर (सुमारे ३१ एकर) शासकीय जमीन जिल्हा परिषदेला मंजूर केली आहे. ही जमीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नावे वर्ग करण्यात येणार आहे.
मंजूर जमिनीत मौजा विसापूर येथील स.नं. ३४३/१ मधील २.७१ हेक्टर आणि मौजा सोनापूर येथील स.नं. १३५/१ मधील १०.०४ हेक्टर असा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे ही जमीन भोगवटा मूल्यरहित व महसूलमुक्त किमतीने देण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आर्थिक तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.
या जमिनीवर प्रशासकीय कार्यालये, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकास प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने काही अटी घालून ही मंजुरी दिली असली, तरी त्यामुळे प्रलंबित विकासकामांना वेग मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेला हक्काची जागा उपलब्ध झाली असून, गडचिरोलीच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विसापूर–सोनापूर परिसर गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता असून, जमिनीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.














