स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; १५.१९ लाखांचा गांजा जप्त

98

विक्रीच्या तयारीत असलेला आरोपी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची तस्करी व उत्पादन रोखण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने कोरची तालुक्यात मोठी धडक कारवाई करत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या एका आरोपीस अटक केली. या कारवाईत १५ लाख १९ हजार ७५० रुपयांचा अंमली पदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अंमली पदार्थांविरोधात कठोर कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ०५ जानेवारी २०२६ रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील मौजा हितकसा येथे ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पुनाराम अलिसाय मडावी (वय ४५, रा. हितकसा, ता. कोरची) याने आपल्या घराच्या सांदवाडीत अवैधरित्या गांजाची लागवड केली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष झडती घेतली.
झडतीदरम्यान घराच्या सांदवाडीत लहान-मोठी एकूण १६० गांजाची झाडे आढळून आली. हिरव्या पानांचे, फुले व बोंडे असलेली ओली झाडे तसेच अर्धसुक्या अवस्थेतील कॅनबिस वनस्पती असा एकूण ३०.३७५ किलो निव्वळ गांजा जप्त करण्यात आला. प्रति किलो ५० हजार रुपये दराने गांजाची किंमत १५ लाख १८ हजार ७५० रुपये, तसेच १ हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक काटा, असा एकूण १५ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीने हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने पिकविल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलीस स्टेशन कोरची येथे ०५/०१/२०२६ रोजी गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(अ), २०(ब)(ii), २०(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुकुंदा देशमुख करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौंड, पोलीस अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे व चापोअं. रामदास ऊईनवार यांनी पार पाडली.