गडचिरोलीत भरदिवसा हिट-अँड-रन : ट्रकच्या धडकेत महिला ठार, दोघी गंभीर जखमी

213

अवजड वाहन बंदी असतानाही ट्रक शहरात कसा? पोलिस भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर भरदिवसा ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जणी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली. मंदा विजय एडलावार (वय ४३, रा. लांझेडा, गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
मंदा एडलावार या आपल्या मुलगी खुशी एडलावार (२१) व पुतणी ऋतुजा एडलावार (१२) यांच्यासह चंद्रपूर मार्गावरील एका कार्यक्रमासाठी एमएच ३१ डीएच ८७३१ क्रमांकाच्या स्कुटीने जात होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर मागून येणाऱ्या एमएच ३४ बीझेड ८२२० क्रमांकाच्या आयसर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघीही रस्त्यावर कोसळल्या.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंदा एडलावार यांचा मृत्यू झाला. खुशी व ऋतुजा यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने हा प्रकार हिट-अँड-रन ठरला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रक कोणाचा? माहिती का दडपली जातेय?

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचा क्रमांक पोलिसांना ज्ञात असूनही सदर ट्रक कोणाच्या मालकीचा आहे, त्यामध्ये कोणता माल वाहतूक होत होती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ट्रक क्रमांकावरून वाहन मालकाचा तपशील सहज मिळू शकतो, असे असतानाही पोलिसांकडून माहिती उघड न केल्याने संशयाची सुई वळू लागली आहे.
चंद्रपूर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे ट्रक सर्रास धावतात. त्यामुळे हा ट्रकही अशाच अवैध वाहतुकीतील तर नव्हता ना, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ट्रकचालकाला पोलिस शोधून काढणार का, की हे प्रकरणही गूढातच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवजड वाहन बंदी असतानाही ट्रक शहरात कसा?

विशेष म्हणजे, रविवार असल्याने शहरात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहनांना शहरातून प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. असे असतानाही हा ट्रक जिल्हा रुग्णालयासारख्या वर्दळीच्या परिसरात कसा पोहोचला, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण व पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भरदिवसा घडलेल्या या दुर्घटनेमुळे गडचिरोली शहरात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे. निष्पाप महिलेचा बळी घेणारा ट्रक आणि त्यामागील सत्य कधी उघड होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.