विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू

766

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू

लोकवृत्त न्यूज
बारामती, दि. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती येथे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर येत असताना हा अपघात झाला. विमान लँडिंगच्या प्रक्रियेत असताना नियंत्रण सुटल्याने ते थेट एका शेतात कोसळले, अशी प्राथमिक माहिती आहे.
या अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानातील ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर व आगीचे लोळ उठले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत पोलिस, अग्निशमन दल व रुग्णवाहिकांना पाचारण केले.
प्राथमिक वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन पथक व आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त विमानाचा परिसर सील करण्यात आला असून बचावकार्य व तपास कार्य एकाचवेळी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तांत्रिक बिघाड, हवामान किंवा लँडिंगदरम्यानची अडचण याबाबत तपास केला जात आहे.
या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्याचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात DGCA व राज्य शासनाकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा असून, पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.