गरजू शहरवासीयांना सरसकट घरकुल द्या – सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे नगरसेवक टेंभुर्णेंची ठाम मागणी

178

गरजू शहरवासीयांना सरसकट घरकुल द्या
– सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे नगरसेवक टेंभुर्णेंची ठाम मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरातील गरजू व आर्थिकदृएष्ट्या दुर्बल नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरसकट घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे गडचिरोली नगर परिषदेचा आढावा घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात आले असता, नगरसेवक टेंभुर्णे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी शहरातील वास्तव परिस्थिती निदर्शनास आणून दिली.
टेंभुर्णे यांनी सांगितले की, गडचिरोली शहरातील बहुतांश वार्ड अतिक्रमित जागांवर वसलेले असून अनेक ठिकाणी सातबारा उताऱ्यावर ‘झुडपी जंगल’ अशी नोंद आहे. या कारणामुळे संबंधित नागरिकांना आजतागायत मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. शासन स्तरावर झुडपी जंगलाचा शेरा हटविण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
मालकी हक्काच्या पट्ट्यांअभावी हजारो गरजू नागरिक शासनाच्या विविध योजना व सुविधांपासून वंचित राहिले असून, घरकुल योजनेसाठी नगर परिषदेकडे मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र, मालकी हक्क नसल्यामुळे पात्र असूनही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही, अशी खंत टेंभुर्णे यांनी व्यक्त केली.
२०११ पूर्वी ज्यांची घरे अस्तित्वात आहेत, अशा सर्व गरजू नागरिकांना मालकी हक्काच्या अडचणी बाजूला ठेवून सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी ठोस मागणी त्यांनी सहपालकमंत्र्यांकडे केली.
यावर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.