गडचिरोली नगर परिषदेला अत्याधुनिक स्वीपिंग मशीन; लोकार्पण आमदारांच्या कार्यालयात, नगराध्यक्षांची अनुपस्थिती चर्चेत

146

 ‘लॉइड्स मेटल्स’च्या सहकार्याने शहर होणार धूळमुक्त ; व्यवस्थापन कंपनीकडेच

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १२ : शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या अत्याधुनिक ऑटोमॅटिक रोड स्वीपिंग मशीनचे लोकार्पण आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात करण्यात आले. ‘लॉइड्स मेटल्स’च्या सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत नगर परिषदेला ही मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सोहळ्याला नगराध्यक्षांची अनुपस्थिती राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी, विविध पक्षांचे नगरसेवक तसेच ‘लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’चे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, मशीन नगर परिषदेला देण्यात आले असले तरी त्याचे इंधन, चालक व संपूर्ण व्यवस्थापन ‘लॉइड्स मेटल्स’ कंपनीमार्फतच केले जाणार असून नगर परिषद केवळ देखरेखीची भूमिका पार पाडणार आहे.

“राजकारण बाजूला ठेवा, विकासाला प्राधान्य द्या” : आमदार नरोटे

लोकार्पणप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना “आपण सर्व एक लाख गडचिरोलीकरांचे प्रतिनिधी आहोत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या स्वच्छता व विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे स्वच्छ व सुबक रस्ते गडचिरोलीतही असावेत, हा माझा ध्यास आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी ५० वर्षांचा विकास रोडमॅप तयार करण्यात आला असून, या मशीनचे आगमन हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘लॉइड्स मेटल्स’चे एमडी बी. प्रभाकरन यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ही सुविधा शहराला मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आगामी काळात सक्षम ड्रेनेज सिस्टीम, आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे व इतर अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा संकल्पही आमदारांनी व्यक्त केला.

या प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री (अनु. जमाती) डॉ. अशोक नेते, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ‘लॉइड्स मेटल्स’चे उपाध्यक्ष नटराजन, भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष गैरहजर; प्रश्न उपस्थित

महत्त्वाच्या या कार्यक्रमात नगराध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या योजनेच्या लोकार्पणावेळी नगराध्यक्ष गैरहजर का? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी स्पष्ट केले की,
“हा कार्यक्रम नगरपरिषदेतर्फे आयोजित नसून ‘लॉइड्स मेटल्स’ कंपनीचा आहे. नगराध्यक्ष आले नाहीत, याबद्दल आम्ही कोणतीही भूमिका मांडू शकत नाही.”

शहरात वाढत्या धुळीच्या समस्येवर तोडगा म्हणून अत्याधुनिक स्वीपिंग मशीनकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असल्या तरी, कार्यक्रमाच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे चर्चेचा केंद्रबिंदू मात्र स्वच्छतेपेक्षा ‘अनुपस्थिती’ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.