१८ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई

304

दंड व कागदपत्र तपासणीही वाढवणार

लोकवृत्त न्यूज
मुंबई – राज्यात वाहन सुरक्षा आणि रस्ते नियमांची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी परिवहन विभागाने हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बाबत कडक निर्णय घेतला आहे. अंतिम मुदत संपून महिने उलटून गेल्या असूनही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी HSRP बसवलेले नसल्यामुळे १८ फेब्रुवारी २०२६ पासून थेट दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

HSRP संदर्भातील नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे आढळल्यामुळे विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. चोरीची वाहने ओळखणे, बनावट नंबर प्लेट्सवर आळा घालणे आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हे या कडक निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहनधारकांना दिलासा देत प्रशासनाने १५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ जाहीर केला आहे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP साठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या, परंतु अद्याप प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवलेली नसलेल्या वाहनधारकांना १८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम संधी देण्यात येणार आहे. वेळेत नोंदणी केलेल्यांवर अन्याय होऊ नये म्हणून हा अतिरिक्त कालावधी दिला असल्याचे भिमनवार म्हणाले.

परंतु ३१ डिसेंबरनंतर नोंदणी केलेल्या किंवा अद्याप नोंदणी न करणाऱ्या वाहनधारकांना थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या दंडात दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहने सर्वांचा समावेश आहे.

विशेषतः HSRP Number Plate बसवण्याच्या बाबतीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे उघड झाले आहे. या भागात सुमारे २४ लाखाहून अधिक पात्र वाहने असूनही फक्त ८.५७ लाख वाहनधारकांनीच HSRP साठी नोंदणी केली आहे, म्हणजे जवळपास ६५ टक्के वाहने अजूनही जुन्या नंबर प्लेटसह रस्त्यावर धावत आहेत. राज्यभरात ही संख्या आणिही गंभीर असून एक कोटीहून अधिक वाहने HSRP शिवाय असल्याची माहिती मिळाली आहे.

१८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तपासणी मोहिमेत फक्त नंबर प्लेट तपासणीपुरती मर्यादा न ठेवता, वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन विमा, PUC प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स या सर्व कागदपत्रांचीही सखोल तपासणी केली जाणार आहे. या कागदपत्रांपैकी कोणतेही आवश्यक प्रमाणपत्र नसल्यास दंडपुन्हा वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, HSRP बसवणाऱ्या अधिकृत फिटमेंट सेंटर्ससमोरही अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वाहनधारक अपॉइंटमेंट बुक करूनही वेळेवर येत नसल्यामुळे तयार नंबर प्लेट्स सेंटर्समध्ये साठून राहिल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया मंदावली आहे.

“आता कोणतीही सवलत मिळणार नाही. नियम सर्वांसाठी समान आहेत.” त्यामुळे दंड, वाहतुकीतील त्रास आणि वेळेचा अपव्यय टाळायचा असेल तर वाहनधारकांनी तात्काळ HSRP नंबर प्लेट बसवून घेणेच हिताचे आहे. असा ठाम इशारा परिवहन विभागाने दिला आहे.