सुरजागडच्या ट्रकची तीन वाहनांना जोरदार धडक; सहा जखमी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि १० मार्च :- गडचिरोली–चामोर्शी महामार्गावरील कुनघाडा रै फाट्यावर बसथांब्यासमोर सुरजागड लोहखनिज प्रकल्पावर कार्यरत असलेल्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात ऑटोमधील सहा प्रवासी जखमी झाले असून एका दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३३ जे ००९७ क्रमांकाची दुचाकी, एमएच ३४ बीएच ३४३० क्रमांकाचा प्रवासी भरलेला ऑटो व एमएच ३३ टी ४९१६ क्रमांकाची पिकअप ही तीनही वाहने रस्त्याच्या कडेला नियमानुसार उभी होती. दरम्यान गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात असलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या एमएच ३४ बीझेड २५०४ क्रमांकाच्या ट्रकने अचानक नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या तिन्ही वाहनांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत ऑटोमधील चंद्रकला सुधाकर गुरपल्ले (रा. कढोली), सुरेश वागू इजमानकर (रा. कढोली), गया ललित इजमानकर (रा. कढोली), प्रेमीला देवराव वाकुडकर (रा. सालधारी), प्रमोद बंडू झाडे (रा. कुरुडचक) व शशिकला शामराव वाकुडकर (रा. सालधारी) हे सहा प्रवासी जखमी झाले. अपघातात दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाली असून इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीने मदत केली. सर्व जखमींना प्रथम कुनघाडा रै येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कुनघाडा रै बसथांबा परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून येथे वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.














