कोरची : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

388

• आरोपीवर पोक्सोसह बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
कोरची : लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय टिल्लू कल्लो (२५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कोरची तालुक्यातील असून फेब्रुवारी २०२५ मध्ये पीडिता १६ वर्षांची असताना, शेजारील गावातील आरोपी अजय कल्लो याने “तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन” असे म्हणून तिला विश्वासात घेतले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही लग्नाची फुस लावून त्याने वारंवार अत्याचार केल्याने पीडिता तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आणि वैद्यकीय अधिकारी बोटेकसा यांनी दिलेल्या गर्भधारणा प्रमाणपत्रावरून पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात ११ मार्च २०२६ रोजी अपराध क्रमांक १०/२०२६ नुसार कलम ६४ (२) (i), ६४ (२) (m) भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ४ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र लहुजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवादार वनिता कोरामी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.