Home Breaking News पैशांच्या वादातून पतीने संपविली जीवनयात्रा

पैशांच्या वादातून पतीने संपविली जीवनयात्रा

434

दारूच्या नशेत असलेल्या पतीने गॅस सिलेंडर भरण्याच्या बहाण्याने पत्नीकडे पैशांची मागणी केली, मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील हरीनगर येथे घडली. दिनेश धनंजय देवनाथ (वय ४० वर्ष) असे मृतकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास दिनेश देवनाथ हा बाहेरून दारू पिऊन घरी आला होता. त्याने गॅस सिलेंडर भरून आणायचा आहे असे सांगून पत्नी बंदना हिच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला असता दिनेशने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीच्या मारहाणीला कंटाळून बंदना ही बचावासाठी शेजाऱ्यांच्या घरी निघून गेली. याच दरम्यान दिनेशने घराच्या वऱ्हांड्यातील दरवाजाच्या वरील भागाला पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास लावून घेतला.
काही वेळाने ही बाब लक्षात आली असता दिनेशचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पत्नी बंदना देवनाथ हिने मुलचेरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तुकाराम हिचामी व पोलीस हवालदार राजेश पुल्लुरी हे करीत आहेत.

Don`t copy text!