ट्रॅव्हल्स आणि स्कॉर्पिओची भीषण धडक ; ५ ठार, ११ जखमी

4987

• वरातीवर काळाचा घाला”

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : लग्न समारंभाचा आनंद क्षणात दु:खात बदलत गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भीषण अपघात घडला. वरात घेऊन परतणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाची ट्रॅव्हल्स बसशी समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 29 मार्च) सायंकाळी सुमारे 6.45 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. MH 46 P 5392 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनातून एकूण 16 प्रवासी रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होते. त्याचवेळी गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स बसशी जोरदार धडक झाली.
धडक इतकी प्रचंड होती की स्कॉर्पिओचा चेंदामेंदा झाला. काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यत व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लग्नाच्या आनंदावर दु:खाचे सावट दाटले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान गडचिरोली चामोर्शी मार्गावरील अपघाताच्या मालिकेने हा मार्ग डेथ मार्ग होत चालला आहे.