सुगंधित तंबाखूचा 9.30 लाखांचा साठा जप्त

384

आरमोरी पोलिसांची धडक कारवाई 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात आरमोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 9 लाख 30 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी मौजा देऊळगाव परिसरात सापळा रचला. पंचांच्या उपस्थितीत आरोपी गोपाल हरिराम निंबेकर (वय 39) व यशवंत विठ्ठल हर्षे (वय 40) यांच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान घराची झडती तसेच एका मारुती वेगेनार (MH 33 AC 6256) वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचे हुक्का शीशा तंबाखू, पान मसाला व सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. यामध्ये ‘होल्ला हुक्का’, ‘ईगल हुक्का’, ‘मजा 108’, ‘विमल पान मसाला’ यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.
तसेच, तंबाखू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन, मोबाईल फोन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत 9,30,990 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोपाल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पार पडली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहेत.