गडचिरोली : नोकरीच्या आमिषाने २.१६ कोटींची फसवणूक, ‘मंत्रालयातील ओळखी’चा बनाव करून युवकाला गंडा

565

• दोन वर्षापासून सुरू होता फसवणुकीचा खेळ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २२ : नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मुलाला अनुकंपा तत्वावर उपजिल्हाधिकारी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी सागर गणपत मडावी (वय २७, रा. गडचिरोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील २०१३ मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. शासनाच्या अनुकंपा धोरणांतर्गत नोकरी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असताना, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वारे (रा. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली.
ज्ञानेश्वर वारे याने “मंत्रालयात ओळखीचे अधिकारी आहेत” असा विश्वास देत उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी सुरुवातीला काही लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्याने टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली. पुढे ‘महाजन साहेब’ नावाच्या कथित अधिकाऱ्याचा हवाला देत, विविध कारणे सांगून मोठ्या प्रमाणावर पैसे मागितले गेले.
फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी विश्वास ठेवून फोनपे, आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात कोट्यवधी रुपये आरोपींकडे दिले. एवढेच नव्हे, तर आरोपीने फिर्यादीचे एटीएम कार्डही ताब्यात घेऊन खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढल्याचे उघड झाले आहे. या दरम्यान फिर्यादीच्या आईने मालमत्ता विक्री, दागिने गहाण ठेवणे व कर्ज काढूनही पैसे उभारले होते.
दरम्यान, सतत आश्वासने देऊनही नोकरी मिळाली नाही. उलट “पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही” अशी धमकी दिल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या संपूर्ण प्रकरणात ज्ञानेश्वर वारे, महाजन साहेब (मुंबई), अजय गोवर्धन भगत, मुकेश यादव व संदीप कुमार यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) व 318(4) अन्वये २० मे रोजी गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे.
ही फसवणूक २० जानेवारी २०२४ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू होती.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, शासनाच्या प्रक्रियेची जाण असलेला युवकही अशा जाळ्यात अडकत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय? ‘नोकरी लावून देतो’ या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणूक रॅकेट्सवर कठोर कारवाईची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शासकीय नोकरीसाठी कोणतीही अधिकृत प्रक्रिया वगळून पैसे देऊ नयेत. ‘ओळखी’च्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.