संविधानाच्या भेटीने विवाह सोहळा ठरला सामाजिक संदेशाचा प्रसारक
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- तालुक्यातील वाकडी (जुनी), येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेने एक स्तुत्य आणि जनजागृतीपर उपक्रम राबवत नवविवाहित दाम्पत्याला भारताचे संविधान भेट दिले.
पूजा दौलत मिसार आणि युवराज सिताराम तिवाडे यांच्या विवाहानिमित्त संघटनेच्या “हर घर संविधान” उपक्रमाअंतर्गत ही अनोखी भेट देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारताच्या प्रत्येक घरापर्यंत संविधान पोहोचवणे, तसेच सामान्य जनतेमध्ये संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
या प्रसंगी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा मायाताई लक्ष्मण मोहुर्ले आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, “भारताचे संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून, मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि समानतेचे मूळ स्रोत आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.”
या विवाह सोहळ्यात धनशीला दौलत मिसार, रमेश व रुपाली तिवाडे यांच्यासह समाज बांधव, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाहाच्या निमित्ताने संविधानाची भेट देण्याचा हा उपक्रम समाजप्रबोधनाचा एक प्रभावी मार्ग ठरत असून, पुढील पिढ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करण्यास निश्चितच मदतकारक ठरेल.


